शिंदे गटातील या मंत्र्याचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना विरोध?
मुख्यमंत्री पदासाठी सुचवले भाजपाच्या या नेत्याचे नाव, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना बळ?
अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजित पवार आघाडीवर असून अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचे म्हटले होते. पण आता थेट शिंदे गटाच्या मंत्र्याने मुख्यमंत्रीपदाला भाजपाच्या नेत्याला पसंती दिलीय.
शिंदे गटाचे नेते व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. “मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत,पण त्यांची अडचण होईल असे मी बोलणार नाही. मला तसे प्रश्नही विचारू नका,” असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. विखेंच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासू राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आलं आहे. पण आता शिंदे गटाच्या नेत्याने थेट भाजपाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिल्याने शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. पण त्याचबरोबर शिंदेचे मुख्यमंत्री जाणे निश्चित आहे का? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान सत्तार हे शिंदे गटाचे नेते असून त्यांनीच असं विधान केल्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
भाजपकडून नेहमीच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच पसंती देण्यात आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील भाजप नेत्यांनी फडणवीसच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटले. पण आता सत्तार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विखेंची अडचण होण्याची शक्यता आहे.