पुण्यात ठाकरे गटाच्या मशाल यात्रेत शिवसैनिकांमध्येच राडा
शिवसैनिक भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल, विरोधकांआधी पक्षातच लढाई
पुणे दि १२(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेना कुणाची? यावर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे देत निवडणूक आयोगाने तात्पुरता मार्ग काढला आहे. ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांनी जल्लोष करत नव्या चिन्हाचे स्वागत केले आहे. पण याचवेळी नव्या चिन्हाचे स्वागत करताना पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये शिवसैनिकांमध्येच राडा झाला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मशाल चिन्ह मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते मातोश्री मशाल क्रांतीज्योतीचे आयोजन करण्यात आले होते.ही मशाल मंचरमध्ये आल्यानंतर ज्योत हातात घेण्यासाठी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे तिथे आले. यावेळी जिल्हा संघटक माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले म्हणाले की ‘शिंदे गट आणि भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्यांचे इथे काय काम? इथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेल्यांनाच मशालीचे स्वागत करण्याचा अधिकार आहे. यामुळे गांजळे यांनी आपण कधीही शिंदे गट आणि भाजपच्या व्यासपिठावर गेलो नसल्याचे सांगितलं. याच कारणावरुन दोघेही भिडले. पण इतर शिवसैनिकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. पण याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नवीन चिन्ह घेऊन विरोधकांशी दोन हात करण्याचा मनसुबा ठाकरे करत असताना शिवसैनिकच भिडल्याचे चित्र दिसून आले आहे.
या राड्यानंतर गांजळे यांनी अनेक पक्ष फिरून आलेल्यांनी मला पक्षनिष्ठेचा सल्ला देऊ नये, असा टोला बाणखेले यांना लगावला. तर बाणखेले यांनी माजी सरपंच दत्ता गांजाळे हे नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे समजत नाही. त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे आव्हान दिले आहे.