पुण्यात लग्नाचे अमिष दाखवत महिलेची आर्थिक फसवणूक
महिलेकडून पैशाची मागणी करताच आरोपीचे धक्कादायक कृत्य
पुणे दि २०(प्रतिनिधी)- पत्नीला असाध्य रोग झाला असल्याचे सांगून एका महिलेची सहानभुती मिळवून तिला लग्नाचे आमिष दाखवत १२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर उमेश पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१६ पासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील दुकानात फिर्यादी काम करीत असताना सागर पवार याने त्यांच्या पत्नीस टी बी नावाचा रोग झाला असल्याचे सांगत सहानूभुती मिळविली. त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन विश्वास संपादन केला त्याचबरोबर फिर्यादीसोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच तिचा आंबेगाव येथील फ्लॅट विकून देतो, असे सांगून त्यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले. तसेच वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण १२ लाख रुपये घेतले. फिर्यादीने हे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने महिलेच्या व्हॉटसअपवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले. त्यामुळे फिर्यादीने आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सागर पवार विरोधात विनयभंग आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डी.जी. बागवे पुढील तपास करीत आहेत.