मोठ्या भावाच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धक्कादायक कृत्य
थरारक घडना सीसीटीव्हीत कैद, भावाचा बदला घेण्यासाठी केले असे काही...
ठाणे दि २२(प्रतिनिधी)- ठाणे जिल्हयातील भिवंडीत आपल्या मोठ्या भावाला पाच वर्षांपूर्वी एका चिकन शॉप चालवत असलेल्या मालकाने आणि मित्राने मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून भावाचा बदला घेण्यासाठी छोट्या भावाने चिकन शॉप मालकावर चक्क चॉपरने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बदल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लखोर भावेशचा मोठा भाऊ अमोल याला पाच वर्षांपूर्वी बिलाल आणि त्याचा मित्र हरिशने मारहाण केली होती. तेव्हापासून मारहाणीचा राग भावेशच्या मनात होता. त्याच रागातून भावेश हा बिलालला मारण्यासाठी संधी शोधत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे १८ जानेवारीला बिलाल मित्रांसोबत सागर ईन या हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. त्यावेळी भावेश देखील तिथेच जेवण करत होता. जेवण झाल्यावर बिलाल जेवणाचे बिल देण्यासाठी काउंटरवर येताच भावेशने बिलालच्या कमरेत चॉपर खुसपला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिलाल जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या आवारात आला. इथेही त्याच्यावर भावेशने चॉपरने सपासप वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात बिलाल हा गंभीर जखमी झाला आहे. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बिलाल शुद्धीवर आल्यावर त्याने पडघा पोलिसांना जबाब देऊन हल्लेखोर भावेश विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पडघा पोलिसांनी हल्लेखोर आरोपी भावेश वामन बेलवले याला अटक केली आहे. अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत. पाच वर्षाच्या रागातुन हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.