(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बिहारमधील मुझफ्फरपूरमधील गयाघाट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येछे एका स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन त्यात पाच मुलं होरपळली आहेत. या मुलांवर गयाघाट पीएचसी येथे उपचार करण्यात येत आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले की, या मुलांनी यूट्युबवर व्हिडीओ पाहून फटाक्याची दारू टॉर्चमध्ये भरून नवा फटाका तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला माचिसची काडी पेटवून लावली. त्यामुळे स्फोट होऊन ही मुलं होरपळली. स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच या स्फोटामध्ये ही पाच मुलं होरपळून जखमी झाली.
स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमी मुलांना उपचारांसाठी गयाघाट येथील रुग्णालयात दाखल केले. आता तिथे या जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासामध्ये कुठल्यातरी स्फोटक पदार्थाचा स्फोट होऊन ही मुलं होरपळल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिक तपास होण्याची आवशकता आहे. दरम्यान, पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी गावातीलच दोन मुलं त्यांच्या मुलांना बोलावून घेऊन गेली होती, तिथे हा स्फोट झाला, अशी माहिती दिली आहे.