राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर
देवेंद्र फडणवीस या तारखेला सादर करणार पहिला अर्थसंकल्प, अधिवेशन वादळी होणार?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. तर ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची ही बैठक पार झाली.या सोबतच विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची ही बैठक पार झाली.यंदा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थ अर्थसंकल्प सादर करणार आहेत, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांची नावे चर्चेत आहेत. विधीमंडळाचे अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असल्याचे ठरले आहे. एकूण चार आठवडे होणार असलेल्या अधिवेशनात ९ मार्चला सादर होणार अर्थसंकल्प हा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा असणार आहे. आगामी निवडणुका लक्षात घेत हा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने लोकप्रिय घोषणा होऊ शकतात.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्चला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. तत्पूर्वी म्हणजे ८ मार्च रोजी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली आहेत. मात्र अर्थतज्ञ असलेल्या फडणवीसांचा अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे.