Latest Marathi News
Ganesh J GIF

नवले पुल अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

खासदार सुळेंची मागणी, नवले पुल परिसरात अपघात सत्र कायम, सुळे गडकरींशी चर्चा करणार

पुणे दि २३(प्रतिनिधी) – पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली. या भागातील अपघातांची मालिका थांबावी यासाठी उपायोजना करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहोत. संसदेत देखील हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुल परिसरात नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस पोलीस वेळेत पोहोचले होते, याबद्दल त्यांचे मी त्यांचे आभार मानते. प्रशासनाने देखील या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!