
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, आता कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यात जमिनीच्या क्षुल्लक वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्या वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात काठीने अमानुष मारहाण केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर पडलेले दिसत आहे. त्यांच्या मागे एक पांढऱ्या रंगाची कार उभी असून, समोर त्यांची दोन मुले उभी आहेत. यातील एका मुलाच्या हातात लाकडी काठी असून, तो अत्यंत निर्दयपणे आपल्या वृद्ध वडिलांना मारहाण करताना दिसतोय. दुसरीकडे, बाजूलाच वेदनेने विव्हळत पडलेली आई आपल्या पोटच्या मुलांना “माझ्या नवऱ्याला मारू नका रे…” अशी विनवणी करताना दिसत आहे. मात्र, या नराधम मुलांना आपल्या आईच्या विनवणीची अजिबात दया आली नाही.

मारहाणीमागील कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडला आहे. आईच्या नावावर असलेली काही जमीन विकल्यामुळे दोन्ही मुले वडिलांवर प्रचंड संतप्त झाली होती. याच रागाच्या भरात इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे मुलांनी आई-वडिलांना गाठून त्यांना जबर मारहाण केली.
पोलिसांत गुन्हा दाखल
आपल्याच मुलांकडून झालेल्या या अमानुष मारहाणीनंतर पीडित वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय तुकाराम राऊत आणि राजेन्द्र तुकाराम राऊत अशी आपल्या जन्मदात्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या मुलांची नावे आहेत. ज्या आई-वडिलांनी कष्ट करून मोठे केले, त्यांच्यावरच अशा प्रकारे काठ्या चालवणाऱ्या या मुलांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

