Latest Marathi News
Ganesh J GIF

MPSC पेपर लीक प्रकरण : “घटना जानेवारीतली, मी पदभार मार्चमध्ये घेतला!”; अध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका, राजीनाम्याच्या मागणीवर दिले उत्तर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात होत असलेले वैयक्तिक आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत भूमिका स्पष्ट करत वस्तुस्थिती समोर मांडली आहे.

“पेपरफुटी अगोदर, कार्यभार नंतर” — एमपीएससी अध्यक्षांचा खुलासा

विवेक भीमनवार यांनी पत्रकात स्पष्ट केले की, औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याची घटना ही जानेवारी २०२६ मधील आहे. तर त्यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि ३ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला. त्यामुळे घटनेच्या वेळी आपण पदावर नव्हतो, हे स्पष्ट करत त्यांनी राजीनाम्याच्या मागणीवर वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.

उच्चस्तरीय समितीची स्थापना अन् कायदेशीर कारवाई

एमपीएससी अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी आयोगाने तत्काळ तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपाय आणि प्रतिबंधात्मक योजना सुचवण्यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. एकूणच संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुधारणा आणण्यासाठी राज्य सरकारनेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

लाखो परीक्षार्थींना दिला विश्वास

भीमनवार पुढे म्हणाले, “अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यापासून परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवण्यावरच माझा मुख्य भर आहे. आयोगावर सोपवलेली वाढीव भरतीची जबाबदारी पूर्ण निष्पक्षतेने पार पाडणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे.”

“प्रश्नांचे स्वागत, पण राजकीय वाद नको!”

लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना प्रश्न उपस्थित करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अशा प्रश्नांचे मी स्वागतच करतो, असे सांगून भीमनवार म्हणाले “कोणत्याही गंभीर आरोपांचे मूल्यमापन हे वस्तुस्थिती आणि पुराव्यांच्या आधारेच झाले पाहिजे. या विषयात लाखो तरुणांचे भवितव्य गुंतलेले असल्याने, याचे रूपांतर वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादात करू नये, ही नम्र विनंती.”

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!