
सुप्रिया सुळे म्हणतात मला त्या नेत्याने ‘उल्लू’ बनवले
खोटे बोलत राष्ट्रवादीतील बाप लेकांचा भाजपात प्रवेश, सुळेंचा या जोडीवर निशाना
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका नेत्याने आपल्या भोळेपणाचा फायदा घेत आपल्याला ‘उल्लू’ बनवल्याचा गाैप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर त्या नेत्याने आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचे लक्षात आल्यानंतर खूप त्रास झाला असेही सुळे म्हणाल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी UNFILTERED by Samdish या यूट्यूब चॅनेलला नुकतीच एक मुलाखत दिली यावेळी तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राष्ट्रवादीचा एक नेता, त्याच्या वडिलांप्रमाणे अनेक वर्षे राजकारणात होता. तो आपल्या कुटुंबातील एक सदस्यासारखाच होता. तो नेता राष्ट्रवादी सोडून जाणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर मी त्याला फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला की, मला अशा-अशा अडचणी येत आहेत. मग मी त्यावर म्हणाले की, तुम्ही घरी या. तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्यावर विचार करू. पटलं नाही तर तुम्ही सोडून जा.” पण भाजपमध्ये गेलो नाही तर आपल्याला आणि आपल्या वडिलांना जेलमध्ये जावं लागेल, आपल्याविरोधात मोठी केस उभी केली जाईल, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्या नेत्याने सुप्रिया सुळे यांना सांगितले. आणि तो नेता भाजपात गेला. पण महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्या नेत्याने पक्ष सोडताना सांगितलेल्या अडचणींबद्दल सुप्रिया सुळेंनी माहिती घ्यायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संबंधित मंत्रालयात फोन करुन मी त्या केसबद्दल माहिती घेतली. दहा दिवसांनंतर त्या खात्याच्या मंत्र्याचा मला फोन आला. त्या मंत्र्याने सांगितलं की, या केसची डीटेल्स देता येत नाही, पण या केसमध्ये काहीच दम नाही. अशी माहिती मिळाल्याचे सांगत त्या नेत्याने आपल्याला उल्लू बनवले असा खुलासा सुळे यांनी केला.
राज्यात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण राष्ट्रवादीतुन अनेक बापलेकाच्या जोड्या भाजपात दाखल झाल्या होत्या यात सोलापुरचे मोहिते पाटील, नगरचे पिचड, की उस्मानाबादचे पाटील अशी चर्चा रंगली आहे.