‘ताईने सुंदर कोकण दाखवून पैसे कमवले आणि आता…
बारसू रिफायनरीवरून 'कोकण हार्टेड गर्ल' झाली ट्रोल, नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरी दि ११(प्रतिनिधी)- सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. कोकणात सुरू असलेल्या वारसू प्रोजेक्टला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसेच बारसू रिफायनरीवरून सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे. पण रिफायनरीला पाठिंबा दिल्यामुळे कोकण हार्टेड गर्ल ट्रोल झाली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने एका व्हिडीओच्या माध्यमातून या प्रकल्पावर तिने भाष्य केलं आहे. अंकिता वालावलकर ही एक सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर ती कोकण हार्टेर्ड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिता मुख्यत्वे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन आणि खाद्य संस्कृतीवर व्हिडीओज करत असते. अंकिताने तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने मुंबईच्या रिफायनरीचा आढावा घेतला आणि तिच्या व्हिडिओमध्ये या रिफायनरी कशा काम करतात याबद्दल सविस्तर माहितीही दिली आहे. परंतु काहींना तिचं मतं पटलेलं नाही, त्यामुळे तिला खूप ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता एका पोस्टर बॉयने सोशल मिडियावर पोस्टरमधील फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर हिला ट्रोल केले आहे. पोस्टर बॉयने हा फोटो शेअर करत पोस्टरवर लिहिले की, “ताईने सुंदर कोकण दाखवून आणि मालवणी भाषा बोलून यूट्यूब वर पैसे कमावले…. आणि आता ताई कोकणात रिफायनरी ला समर्थन देतेय… असं कसं चालेल ताई ? “हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रिफायनरीच्या मुद्यावर वातावरण तापले आहे. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनीही याचा विरोध करत ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी या प्रकल्पाला पाठिंबा देत रिफायनरीमुळे रोजगार निर्मीती होईल आणि विकासाच्या अनेक वाटाही खुल्या होतील असे मत व्यक्त केले आहे.
बारसू रिफायनरी मुळे कोकणातील वातावरणात, पर्यावरणामध्ये वाईट परिणाम, फळ झाडे नष्ट होणे, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दुषित पाण्यामुळे तेथील नद्या दुषित होतील, सोबत कोकणातील उद्योग धंद्यावर आणि मासेमारीवर परिणाम होणार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.