ठाकरेंच्या आमदारांना शिंदेच्या शिवसेनेचा व्हीप पाळावा लागणार?
शिंदे गटाची खेळी यशस्वी होणार की ठाकरे बाजी मारणार, बघा घटनातज्ञ काय म्हणतात
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानंतर ठाकरे आणि शिंदेमधील व्हीप नाकारल्यामुळे जो खटला न्यायालयात सुरु आहे तो व्हीप आता ठाकरे गटाला पाळावा लागेल का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हिप लागू करुन आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या १४ आमदारांना कोंडीत पकडण्याचा डाव शिंदे गटाने आखल्याची चर्चा होताना दिसत आहे. गोगावले यांनी आज विधिमंडळातील पक्ष कार्यालयाचा ताबा घेत त्याचे संकेत दिले आहेत. त्यातच व्हिपचे पालन न करणाऱ्या आमदारांवर कारवाई होऊ शकते, असे संकेत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिले होते. त्यामुळे बरेच अंदाज वर्तवले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना अशाप्रकारे ठाकरे गटाची आमदारांवर कारवाई करू शकत नाही, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. पक्षांतर बंदी कायद्यातील चौथ्या परिच्छेदानुसार, एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले, त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर उरलेले लोक आहेत, त्यांचा वेगळा पक्ष असतो. तो वेगळा पक्ष ठरतो, बाहेर पडलेल्यांचा वेगळा पक्ष होतो. त्यामुळे एकनाथ शिंदें गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांवर लागू होणार नाही, त्याचबरोबर आता कायद्याच्या दृष्टीने ठाकरे आणि शिंदे गट वेगवेगळे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांचे एकमेकांवर नियंत्रण नाही. त्यामुळे शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे मत काही कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. पण यावरून देखील दोन्ही गटात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते. त्यामुळे आता शिंदे गट हा अधिकृत शिवसेना पक्ष ठरला आहे. याविरोधात ठाकरे गटाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे न्यायालय स्थगिती देणार की शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देणार यावर देखील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.