राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला
अजित पवारांची पुन्हा शिंदे गटावर कुरघोडी, शिंदे गटाला अवघ्या एवढ्याच जागा, भाजपाची मोठी खेळी
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या अखेर होण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या आमदारांच्या नियुक्त्यांचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गट यांच्यात या जागांचे वाटप होणार आहे अशी माहिती आहे. पण त्यातही अजित पवार यांनी शिंदे गटावर कुरघोडी करत बाजी मारली आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून मोठा गदारोळ झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकासआघाडीचे सरकार यांच्यात त्यावेळी जोरदार संघर्ष झाला होता. अनेकवेळा स्मरण देऊनही कोशारी यांनी यावर निर्णय दिला नव्हता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोश्यारी यांच्यात त्यावेळी पत्रसंघर्ष देखील झाला होता. असे असेल तरी कोश्यारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार थेट न्यायालयात गेले होते. यावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. दरम्यान, ही स्थगिती आता उठवली असल्यामुळे आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारमध्ये भाजप, शिवसेना राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आल्याने त्यांच्यात या जागांचे वाटप केले जाणार आहे. भाजपला ६ राष्ट्रवादीला ३ आणि शिवसेनेला ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला आपल्या दोन जागा सोडाव्या लागणार आहेत अगोदर हे जागा वाटप भाजप ७ आणि शिंदे गट ५ असे ठरल्याची चर्चा होती. पण आता शिंदे गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. दरम्यान अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना यादी पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.
विधानसभेच्या रिक्त जागांवर राज्यपाल यांच्या मार्फत आमदारांची नियुक्ती केली जाते. या बाबत मुख्यमंत्री त्यांना सल्ला देत असतात. कलम १६३ (१ ) अंतर्गत राज्यपाल या निवडी करू शकतात. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदारांची नियुक्ती करु शकतात. मात्र, अंतिम निर्णय हा राज्यपालांचा असतो.