बाॅलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री लढणार लोकसभा निवडणुक?
‘या’ पक्षातून लढणार लोकसभा निवडणूक?, मुंबई किंवा पुण्यातून उतरणार रिंगणात, पक्षाला फायदा होणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजपा भाकरी फिरवणार असून मुंबईतील भाजपाच्या काही खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात येणार आहेत. त्यातच बाॅलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत देखील आगामी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे. ती भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.
माधुरी दिक्षीत आगामी लोकसभा निवडणूकीत दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. अमित शाह यांनी काल मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केली. यावेळी मुंबईतून माधुरी दीक्षित यांना उमेदवारी देण्यावर चर्चा करण्यात आली. दक्षिण मुंबईतून माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पुण्यातील जागेसंदर्भातही माधुरीची चर्चा सुरु आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळीही भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील काही नेतेमंडळींनी माधुरीकडे निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली होती. तसेच त्यावेळी भाजपाचे तेंव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी माधुरीच्या घरी जात तिची भेट घेतली होती. पण त्यावेळी मी एक कलाकार असून माझा राजकारणाशी संबंध नाही. मला राजकारणात रसही नाही. त्यामुळे राजकारण प्रवेशाचा प्रश्र्नच येत नाही आणि मी राजकारणात येण्याचा कधी प्रयत्नही करणार नाही, असा खुलासा अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने केला होता. त्यामुळे माधुरी खरेच निवडणुक रिंगणात उतरणार की आपला निर्णय कायम ठेवणार याचा खुलासा लवकरच होणार आहे.
मुंबईमध्ये लोकसभेचे एकूण ६ मतदारसंघ आहेत. यातील ३ जागेवर भाजपचे खासदार आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मनोज कोटक, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी, आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. माधुरी दिक्षीत यांना भाजपने मुंबईतून उमेदवारी दिली तर कोणाचा पत्ता कट होणार हे पहावे लागणार आहे.