
‘निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष चोरांना गाडायचे आहे’
उद्धव ठाकरेंमध्ये दिसला ठाकरी बाणा, ओपन कारमधून उद्धव ठाकरेंचे आदेश
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेरुन ओपन कारमधून शिवसैनिकांना संबोधित केले आहे. आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागा, चोर आणि चोरबाजाराला गाडायचे आहे असा आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण देण्याचा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे समता पार्टी देखील मशाल चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे १९६९ साली जसे बाळासाहेब ठाकरे यांनी जीपवर उभे राहून भाषण केले होते अगदी त्याचपद्धतीने उद्धव ठाकरे यांनी ओपन कारमधून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे. ते म्हणाले की, “आपल्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह चोरणाऱ्यांना निवडणुकीत गाडल्याशिवाय राहायचं नाही. हे ज्यांनी चोरलं त्यांना माहिती नाही, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. त्यांना आजवर मधाची चव चाखली पण आता त्यांना डंख मारायची वेळ आली आहे.. ज्या पद्धतीनं हे कपटानं राजकारण करतात त्या पद्धतीनं मशाल चिन्ह देखील घालवतील. पण, धनुष्यबाण चोरलंय त्यांना सांगतो तुमच्यापुढं मशाल चिन्ह घेऊन लढून दाखवतो. मी कुठं खचलेलो नाही, खचणार नाही,माझ्या हातात काही नाही पण एवढंच सांगतो. तरुण रक्त त्यांनी चेतवलेलं आहे. आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. आगामी काळात योग्य वेळी आपण शिवसैनिकांना आदेश देत राहू असे देखील ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते.
निवडणूक आयोगाने शिवसेनेत सर्व प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली नव्हती असा शेरा निवडणूक आयोगाने दिला आहे. पण या नंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा निवडीची प्रत आणि व्हिडिओ निवडणूक आयोगाला पाठवला आहे. पण आज ब-याच दिवसानंतर उद्धव ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा दिसून आल्याने शिवसैनिकही आक्रमक झालेले पहायला मिळाले.