शिवसेना हातात येताच एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना दणका
मनसेचा नेता शिवसेनेच्या वाटेवर, मनसेचा हात सोडत शिंदेना साथ
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष हातात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिला धक्का उद्धव ठाकरे यांच्याएैवजी राज ठाकरे यांना दिला आहे. मनसेतील गटबाजीला कंटाळलेला कोकणातील एक मोठा नेता लवकरच शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
मनसेचे पेण तालुका अध्यक्ष रुपेश पाटील हे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मनसे मधील पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी वेगळी वाट निवडली आहे. आता याच कारणामुळे रुपेश पाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसा दिवशी रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या. त्यावेळी ते शिंदेची साथ देणार असल्याचे संकेत मिळाले होते. दरम्यान मनसेचे रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांनी रुपेश पाटील यांच्या निर्णयाबद्दल माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांच्या सोबत शेकडो पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

आगरी समाजातून येणाऱ्या रुपेश पाटील यांचा जनसंपर्क मध्य-रायगड जिल्ह्यात मोठा आहे. पाटील गेल्या १५ वर्षांपासून मनसे पक्षामध्ये सक्रीय आहेत. पण यामुळे मनसेतील गटबाजीचा मुद्दा समोर आला आहे. राज ठाकरेंना यावर तोडगा शोधावा लागणार आहे.