राज्यात लवकरच तिसरा राजकीय भूकंप! काँग्रेस फुटणार?
राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? काँग्रेसचा बडा नेता भाजपाच्या गळाला, एवढे आमदार फुटणार?
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- अजित पवार यांच्यासह एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालेला आहे. या राजकीय भूकंपानंतर आणखी एक भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधला एक मोठा गट सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यानंतर भाजपा आता काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. आजघडीला भाजपाकडे सर्व मित्र पक्षाचे मिळून २०० आमदारांचे समर्थन आहे. पण तरीही भाजपा धास्तावली आहे.त्यामुळे अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मध्यंतरी अशोक चव्हाण भाजपात जाणार अशी चर्चा रंगली होती. पण नंतर ती बंद झाली. पण अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सामील होत, सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यानंतर युतीतील काही नेत्यांनी आता काँग्रेसचा नंबर अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली होती. थोरात किंवा चव्हाण यांना गळाला लावण्यासाठी भाजपाचे हायकमांड प्रयत्न करत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असलेला एक गट फुटून शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सत्तेत सहभागी होऊ शकतो, असं एक समीकरण राजकीय विश्लेषकांकडून मांडलं जात आहे. कारण पटोले यांची तक्रार करूनही काँग्रेस हायकमांडने अजूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे ते कारण पुढे करत काँग्रेसचा एक गट भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे.
अशोक चव्हाण यांनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे. ‘ज्यांना माझं चांगलं होतंयं हे बघवत नाही त्यांच्याकडून अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा’ दावा चव्हाण यांनी केला आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती काहीच अशक्य नसल्याचे चित्र आहे.