गावकऱ्यांनी अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा
संतोष बांगर यांना जोरदार विरोध, वारंगा मसाई यात्रेत नेमके काय घडले?
हिंगोली दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे कुलदैवत देवी मसाई मातेची यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे वारंगा मसाई येथे आले होते. पण या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. त्यामुळे देवीची यात्रा हा आमच्या गावातील धार्मिक कार्यक्रम असून या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येऊ नये यासाठी आमदार बांगर यांना यात्रेत येण्यापासून रोखण्यात आले. पण बांगर यांचे कार्यकर्ते दर्शन घेण्यासाठी आग्रही होते. पण गावच्या यात्रेत राजकारण नको म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवत आमदार बांगर यांना दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला.
आमदार संतोष बांगर हे लोकप्रतिनिधी असून त्यांनी गावातील शांतता राखण्यासाठी प्रयत्न म्हणून मध्यस्थी केली असती तर तणावाचं वातावरण निर्माण झाले नसते, अशा चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरु होत्या. दरम्यान या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.