..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?
बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, पोलीसांच्या हाती महत्वाचे पुरावे
बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे.
बुलढाण्यात पेपर फुटीचे पडसाद विधानसभेत देखील पहायला मिळाले होते. विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल केला होता.आता पोलीसांच्या तपासात यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुंबईतील दादर येथील डॉ. अॅण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे मुंबई सायबर पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून याचे काही पुरावे पोलीसांच्या हाती लागले आहेत.पेपरफुटीसाठी ज्या Whatsapp ग्रूपचा वापर करण्यात आला त्यात एकूण ९० जणांचा समावेश होता. त्यात काही शिक्षक, विद्यार्थी यांचा समावेश होता. पण पेपर फुटीची बातमी प्रसारित होताच तो ग्रुप डिलीट करण्यात आला होता. पोलीसांनी बुलढाणातील राजेगाव येथील दोन शिक्षकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जर हा पेपर राज्यभर लीक झाला असेल तर बोर्डाला तो पुन्हा घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक ६०१, ६०२, ६०६, ६०८ ६०९ या पाच परीक्षा केंद्रावरील मंडळाकडून केंद्रसंचालक व रनर यांना तत्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.