
पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात शुक्रवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणाची चाकू आणि चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून ही घटना घडली असून, या हल्ल्यात मृत तरुणाचा चुलत भाऊदेखील गंभीर जखमी झाला आहे.

नेमकी घटना काय?

सुभान हमीद शेख (वय १९, रा. रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर अर्शद रमजान शेख (वय २१, रा. थेरगाव) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभानचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या आईचा या नात्याला तीव्र विरोध होता. तरुणीच्या आईचा मित्र असलेला संशयित विशाल सूर्यवंशी याने सुभानला या प्रेमसंबंधातून बाजूला होण्यासाठी अनेकदा धमकावले होते. याच कारणावरून त्यांच्यात आधीपासून वाद सुरू होता.

भररस्त्यात गाठून केला हल्ला
शुक्रवारी (दि. ८) रात्री ११ वाजेच्या सुमारास थेरगावमधील शिवशंकर कॉलनी आणि श्रीकृष्ण दूध डेअरीसमोरील रस्त्यावर विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभानला गाठले. तिथे त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात संशयितांनी सुभानवर चाकू आणि चॉपरने सपासप वार केले.सुभानच्या हातावर, पोटावर आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. भावाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या अर्शदवरही आरोपींनी हल्ला केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांकडून आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत सुभानचे वडील हमीद नझीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी (दोघेही रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस अधिक पुरावे गोळा करत आहेत.

