Latest Marathi News
Ganesh J GIF

नवी गाडी अन् ड्रोनने शूटिंगचा थाटमाट अंगाशी!; पुणे-बंगळुरू महामार्गावर रील बनवणे पडले महाग; थेट पोलीस ठाण्यात रवानगी

सोशल मीडियावर काही सेकंदांची प्रसिद्धी आणि ‘लाइक्स’ मिळवण्यासाठी सार्वजनिक नियमांची पायमल्ली करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुण्यात समोर आला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर नवी कोरी गाडी घेऊन केलेला थाटमाट आता थेट पोलिसांच्या कारवाईपर्यंत पोहोचला आहे.

कंटेनरवर गाडी, गाड्यांचा ताफा आणि ड्रोन शूटिंग!

मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सोमनाथ अशोक केदारी यांनी शोरूममधून नवी कोरी गाडी खरेदी केली होती. या नव्या गाडीचे स्वागत करण्यासाठी महामार्गावरून गाडी वाहून नेणाऱ्या एका मोठ्या कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या कंटेनरवर नवी गाडी ठेवून, पुढे फॉर्च्युनर कार आणि अवतीभोवती मित्रांच्या गाड्यांचा ताफा चालवला जात होता. या संपूर्ण सोहळ्याचे आकाशातून ‘ड्रोन कॅमेऱ्या’च्या साह्याने चित्रीकरण केले जात होते.

सार्वजनिक महामार्गावर वाहतूक कोंडी

या वाहनांच्या ताफ्यामुळे आणि संथ गतीने चालणाऱ्या चित्रीकरणामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या संपूर्ण घटनेची रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. रील अवघ्या काही तासांत व्हायरल झाली खरी, पण त्यासोबतच ‘सार्वजनिक रस्त्यावर असा प्रकार करून इतर प्रवाशांना ओलीस ठेवणे कितपत योग्य आहे?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला.

पोलिसांनी उगारला बडगा; गाडी अन् कॅमेरा जप्त!

सोशल मीडियावरील ही व्हायरल रील बावधन पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी फॉर्च्युनर कारचा चालक सोमनाथ अशोक केदारी आणि रील बनवणारा फोटोग्राफर अजय संभाजी यादव या दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच, शूटिंगसाठी वापरलेली फॉर्च्युनर कार आणि ती नवी कोरी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

“काही सेकंदांच्या प्रसिद्धीसाठी कायद्याशी खेळू नका” – पोलिसांचे आवाहन

या घटनेनंतर बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना कडक इशारा दिला आहे. “आजकाल नवी गाडी किंवा महागडी बाईक घेतल्यानंतर रील बनवण्याची क्रेझ वाढली आहे. मात्र, प्रसिद्धीच्या नादात सार्वजनिक रस्त्यांवरील नियम आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. रील व्हायरल झाली म्हणून प्रसिद्धी मिळेलच असे नाही, तर थेट जेलची हवाही खावी लागू शकते. त्यामुळे रील बनवताना नियमांचे पालन करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!