शरद पवार गटाचा ‘हा’ नेता लवकरच महायुतीत सामील होणार?
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर झाली गुप्त बैठक, लवकरच शपथविधी?, शरद पवारांना धक्का?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेलाच आहे. जुलैमध्ये अजित पवार आणि सहकारी सत्तेत सामील झाले. पण शिंदे भाजपा नेत्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. पण आता शिंदे सरकारमधील एका मंत्र्याने खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट करत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, कालच पित्रपक्ष संपला, काही लोकांच्या मनात शंका असते त्यामुळे या काळात मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र आता नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शरद पवार गटातील काही नेते महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत. आमचे दोन-तीन महत्त्वाचे नेते आहेत, त्यांच्याशी याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबरोबर संबंधित सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहेत. कदाचित त्यापैकी काही जण महायुतीला पाठिंबा देणार असतील, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागत असेल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे ते नेते कोण आहेत, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दसरा, दिवाळीत मोठे धमाके होतच असतात. मात्र यावेळी मोठा धमका होईल. असे म्हणत आणखी मोठे राजकीय भूकंप होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मध्यंतरी जयंत पाटील महायुतीत सामील होणार अशी चर्चा रंगली होती. तसेच जयंत पाटील मुख्यमंत्री होणार अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे महायुतीत नेमके कोणते नेते सामील होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी दिल्लीतून देखील परवानगी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ मंत्री कॅबिनेट आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे यांच्या शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत, एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. त्यामुळे मंत्रिमंडळात १४ जणांचा समावेश होऊ शकतो. त्याचे वाटपही ठरले आहे. पण विस्तार अजूनही रखडल्याने अनेक चर्चा सुरु आहेत.