भाजपाच्या या महिला नेत्याला यामुळे पोलीसांनी ठोकल्या बेड्या
सोशल मिडीयावर ते फोटो व्हायरल करणे पडले महागात, न्यायालयीन कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण?
यवतमाळ दि १६(प्रतिनिधी)- उमरखेड येथे शाळेत निघालेल्या एका पाचव्या वर्गातील बालिकेला दुचाकीवर सोडून देण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्यानंतर गुन्हेगाराला अटक देखील करण्यात आली आहे. पण या प्रकरणी आता एका भाजपच्या महिला नेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
उमरखेडमध्ये १० ऑक्टोबर रोजी शाळेला जाण्यासाठी निघालेल्या ११ वर्षीय मुलीला आरोपीने आपल्या दुचाकीवर बसवून बेलखेड शिवारात घेऊन जात अत्याचार केला होता. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण याप्रकरणी डाॅ. साईली शिंदे यांनी केवळ प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी पीडित बालिकेच्या सांत्वनपर भेटीचे फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. पण आता न्यायालयाने त्या महिलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिची रवानगी कारागृहात केली आहे. कारण एखाद्या मुलीवर, महिलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार झाला तर तिची कोणतीही ओळख समाजासमोर आणू नये, तिचे नाव वा फोटो प्रकाशित करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालायने या आधी दिले आहेत.तरीही केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि केवळ जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःला भाजपची पदाधिकारी आणि बड्या नेत्यांशी जवळीक असल्याचे सांगणाऱ्या डॉ. साईली शिंदे यांनी त्या पीडित बालिकेचे भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. ही बाब स्थानिक लक्ष्मीकांत मैड नामक व्यावसायिकाच्या लक्षात येताच त्याने उमरखेड पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली होती. दरम्यान शिंदे यांना न्यायालयीन कोठडी सुनावताच त्यांची प्रकृती खालावली होती. पण उपचारानंतर त्यांना पहाटे कारागृहात दाखल करण्यात आले आहे. पण एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. तिने एका सराईत गुन्हेगाराकडून स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तिच्यासोबत माझ्या मोबाईलमध्ये फोटो घेतले होते. पण शुक्रवारी एका कार्यकर्त्यांने माझ्या मोबाईलमधून ते फोटो घेतले आणि व्हायरल केले. हे माझ्या विरोधात करण्यात आलेले षडयंत्र आहे. अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली होती.
डॉ. साईली शिंदे या मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. त्या स्वतःला भाजप पदाधिकारी असल्याचे सांगत असतात. तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे येथून निवडणुक खेचण्यासाठी त्या इच्छुक आहेत.