
दुचाकीचे हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी
मार्च अखेरीस वसुलीसाठी देशी जुगाड, व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल
छत्रपती संभाजीनगर दि १७(प्रतिनिधी) – मार्च महिना सुरु असल्याने सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावला जात आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने चक्क जप्त केलेली दुचाकी कुण्या मोठ्या वाहनात नव्हे तर चक्क त्यांच्याच दुचाकीवर टाकून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फायनान्सवर दुचाकी विकत घेतली होती. मात्र, वेळेवर त्यांच्याकडून हफ्त्याची परतफेड न झाल्याने फायनान्सचे दोन कर्मचारी रोटेगाव येथे त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. यावेळी शेतकऱ्याकडे थकीत हफ्ते भरा नाहीतर दुचाकीची चावी द्या, पण शेतकऱ्यांने दोन्ही गोष्टीसाठी असमर्थता दर्शवली. हीच संधी साधत फायनान्स कंपनीसाठी वसुली करणाऱ्यांनी चक्क बाईक दुसऱ्या बाईकवर ठेवून जप्त करुन नेली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने थकीत असलेली रक्कम भरुन दुचाकी परत मिळवली असली तरी हे कर्मचारी दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडीओ मात्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बाईकवर ट्रिपल सीट किंवा त्याहून अधिक जण प्रवास करतानाचे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत. कारण असे व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध होत असतात. पण दुचाकीवर दुचाकी घेऊन जाण्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान कर्जाच्या परतफेडीची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराकडे तगादा सुरु होता अशी चर्चा परिसरात आहे.