उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले
ठाकरे यांनी सत्तेपोटी सारेच विषय सोडले, गजानन कीर्तिकरांचा दाखला, कोणी केली टिका
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असताना, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केली, त्यामुळे मराठा आरक्षण त्यांनी गमावले, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाकडे कानाडोळा केला. शरद पवार यांनी दुर्लक्ष केले आणि आता सरकारवर आरोप करण्याचा अधिकार त्या दोघांनाही नाही. हाती सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण टिकवले नाही. आता त्यांचे बोलणे निरर्थक आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. उदयनिधी स्टॅलीन यांनी केलेल्या सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषेवर प्रश्न उपस्थित करताना बावनकुळे म्हणाले, ‘‘स्टॅलिन हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्या आघाडीत उद्धव ठाकरे आहेत. स्टॅलिन यांच्याबाबत ठाकरे यांनी अद्याप ‘ब्र’ शब्दही उच्चारला नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी आता सर्वच विषय सोडले आहेत. सनातन धर्म संपविण्याची भाषा करण्याऱ्यासोबत ठाकरे आहेत, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्यांना स्टॅलिन यांनी केलेली टिका मान्य आहे असे समजायचे का?’’ असे बावनकुळे म्हणाले.
शिवसेना नेते पक्ष सोडून जात असताना उद्धव ठाकरे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, असे गजानन कीर्तिकर खरे बोलले. एकनाथ शिंदे व इतर नेते सोडून गेले तरच पक्षाची कमान आदित्य ठाकरेच्या हाती देता येईल, असे त्यांना वाटत होते. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांची कामे होत नव्हती, त्यांना मातोश्रीवर प्रवेश नव्हता असा दावा देखील बावनकुळे यांनी केला.