उद्धव ठाकरेंनी डाव टाकलाच, शिंदे गट अपात्र ठरणार?
उद्धव ठाकरेंची शिंदे गटाविरोधात मोठी खेळी, शिंदे जाणार पण पवारांमुळे भाजपाचीच सत्ता राहणार?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेतून केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले, तसेच विधिमंडळात घडलेल्या अनेक घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. परंतु आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. या सुनावणीला दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या निलंबनाबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय लवकर निर्णय देणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाच्या या याचिकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान ठाकरे गटाने ही याचिका दाखल केल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे. एकीकडे अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे सरकारमधील महत्व कमी झाल्याने शिंदे गटाला भाजपाची साथ मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.
ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्यात आली होती,अगदी त्याच प्रमाणे राष्ट्रवादीलाही मोठे खिंडार पाडण्यात आले आहे.त्यावेळी शरद पवार यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं म्हटलं होते. तर आता ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांना साथ दिली आहे.