शिवसेना निसटलेल्या उद्धव ठाकरेंकडे आता कुठले पर्याय?
न्यायालयात जाण्याआधी उद्धव ठाकरेंना याचा निर्णय घ्यावा लागणार, बघा पर्याय
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे. त्यामुळे आता ठाकरेंचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तर आताही ठाकरेंसमोर काही पर्याय शिल्लक आहेत.
उद्धव ठाकरे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टात आपील करून दाद मागू शकतात. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती दिली, तर मग जैसे थे परिस्थिती राहील. पण जर स्थगिती दिली नाही. तर मग ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. दुसरा पर्याय म्हणजे ठाकरे गटाला आता नवीन नाव घ्यावं लागेल, हा त्यांच्याकडे पर्याय असू शकतो. कारण शिवसेना हे नाव त्यांना वापरता येईल किंवा नाही हा निर्णय निवडणूक आयोग घेईल. पण सध्याच्या स्थितीत ठाकरे गटाला चिन्हासाठी आणि नवीन पक्षाच्या नावासाठी आयोगाकडे मागणी करावी लागणार आहे. अर्थात थोडासा बदल करुन ठाजरे शिवसेना नाव वापरू शकतात.पण यासाठी त्यांना निवडणूक आयोगाकडे मागणी करावी लागणार आहे. यासाठी ते काँग्रेस पक्षाचे उदाहरण देऊ शकतात. कारण राष्ट्रवादी, तृणमुल, वायआरएस या पक्षांच्या नावातही काँग्रेस आहे. पण त्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी आगामी वाटचाल अवघड असली तरीही एखादा पर्याय ते निश्चित वापरु शकतात.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर न्यायालयाचा निर्णय येण्याआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का? असा सवाल उपस्थित केला आहे.