
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेची असा वाद सुरु असतानाच महाराष्ट्र विधिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना दिलासा असून शिंदे गटाची मात्र चिंता वाढली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत ही माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवेसना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या जागेवर काँग्रेसनेही दावा केला होता. पण शिवसेनेचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अंबादास दानवे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली आहे.
विधानसभेत अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आहे. तर विधान परिषदेत ही जबाबदारी दानवे यांना देण्यात आल्याने आगामी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारची दोन्ही सभागृहात लिटमस टेस्ट सारखी स्थिती राहणार आहे.