मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानुसार ८ ऑगस्टपर्यंत ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांना पक्षाबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान, कागदपत्र सादर करण्यासाठी ठाकरेंनी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. ही मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निकाल येत नाही तोवर निवडणूक आयोगाने कारवाई करू नये असा आदेश आल्याने निवडणूक आयोगानेही घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन वेगळा गट स्थापन केला. त्याचबरोबर १२ खासदारही सोबत घेतले. त्यामुळे शिंदे गटाने आपण मूळ शिवसेना पक्ष आहोत असा दावा केला आहे. या दाव्याला कायदेशीर मान्यता मिळण्याकरता त्यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत याचिका दाखल केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रेबाबत याचिका दाखल केली आहे. तर शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचवेळी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मनाई केल्यामुळे शिवसेनेची चार आठवडे मुदत वाढीची मागणी मान्य करण्यात आली आहे.
८ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख होती. पण दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत.मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार घाई नसल्याने कागदपत्रे सादर करण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.