Latest Marathi News
Ganesh J GIF

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ९४ व्या वर्षी निधन

चित्रपटसृष्टीतील एका पर्वाची अखेर, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना लाटकर यांचे निधन झाले त्या ९४ वर्षाच्या होत्या. सुलोचना दीदी या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा शेवट झाला असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती चिंताजनक होती.

सुलोचना लाटकर यांचा ३० जुलै १९२८ रोजी जन्म झाला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भुमिका गाजवल्या. त्यांनी सुमारे २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भुमिका केल्या. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान एक अभिनेत्री म्हणून सुलोचना यांनी चाळीशीच्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि अनेक हिट मराठी चित्रपट दिल्यानंतर त्या हिंदी चित्रपटांच्या नायिकाही बनल्या. हिंदी सिनेमामध्ये त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकामध्ये आईच्या अनेक भूमिका केल्या आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सोमवार, ५ जून रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच २००४ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि २००९ मध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘मराठा तितुका मेळावा’, ‘मोलकरीण’, ‘बाळा जो रे’, ‘सांगते ऐका’, ‘सासुरवास’, ‘वहिनी ची बांगड्या’ या त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे.

सुलोचना लाटकर हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. यांच्या निधनाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!