विलासरावांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर?
आमदार निलंगेकरांचा विरोध तर बावनकुळेंचे संभाव्य पक्षांतरावर सूचक विधान
लातूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं. आमदाराच्या या वक्तव्यामूळे लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.पण निलंगेकरांनी त्यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला आहे.
अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले की,जरी अमित देशमुख भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार नाही. त्यांचा भाजप प्रवेश माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही, कारण अमित देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत, अशी टिका निलंगेकर यांनी केली आहे. लातुरच्या राजकारणात देशमुख घराण्याचं चांगलंच वर्चस्व आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. लातुर जिल्ह्यात देशमुख घराण्याला मोठा जनाधार आहे.त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्यास पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकीकडे आमदार देशमुख यांना पक्षात घेण्यास विरोध करत असताना दुसरीकडे मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील, सगळे जण भाजपामध्ये येतील, यात बरीच मोठमोठी नावं आहेत, फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.