म्हणून पुण्यात कोयता गँगने तोडला त्या तरूणाचा हात
पुण्यात कोयता गँगची दहशत कायम,अल्पवयीन मुलांचा सहभाग पोलीसांसमोर आव्हान
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढतच चालली आहे. चतुशुंगी परिसरात मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने शंभर रुपयांच्या कारणावरून तरुणावर वार करून त्याचा हात तोडल्य़ाची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. टोळक्यात दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.
आशुतोष अर्जुन माने याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज तांबोळी आणि त्याचे मित्र पाषाण परिसरात राहतात. पंकज एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी खाणावळ बंद असल्याने पंकज आणि त्याचे मित्र मध्यरात्री पाषाण परिसरातील साई चौकात जेवण करायला गेले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपींनी त्याच्याकडे शंभर रुपयांची मागणी केली. पंकजने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर चिडून हल्ला केला. त्यामध्ये त्याचा हाताचा पंजा कापला गेला. या घटनेची माहिती मिळताच चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंकजला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीसांनी प्रणव काशीनाथ वाघमारे, गौरव गौतम मानवतकर यांना अटक केली असून अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत असुन नागरिक भयभीत झाले आहेत. मध्यंतरी वडगाव बुद्रुक आंबेगाव सिंहगड कॉलेज येथील काही तरुणांंचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते कोयता घेऊन रस्त्यावर फिरत होते. लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलीसांनी त्यांची चांगलीच धुलाई केली होती.