महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय भूकंप होणार?
शिंदे सरकारमधील मंत्र्याचा दावा, म्हणाले आपण जबाबदारीने बोलतोय....
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी भाजपाने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी रणनिती तयार ठेवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही आमदारांना महायुतीने संपर्क साधला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. आपण जबाबदारीने हे बोलत आहोत आणि त्याची प्रचिती लवकरच महाराष्ट्राला येईल, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोक सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच हा बदल राज्याला दिसेल. त्याचबरोबर १७२ आमदार आमच्या पाठीशी आहेत. आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले आहेत. गेले काही दिवस महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे अंतर्गत कुरघोडीतून महाविकास आघाडी तुटणार असा दावा सत्ताधारी करत आहेत. त्यात सामंत यांनी दावा केल्यानुसार राज्यात नवीन सत्तांतर होणार का? ही भाजपाचे आॅपरेशन लोटस यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे आहे.
यावेळी उदय सामंत यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘सामना’मधून शरद पवार यांच्याबद्दल लिहिलेल्या वक्तव्यावर नंतर सारवासारव करण्यात आली. महाविकास आघाडीची मोट ज्यांनी बांधली त्या शरद पवार साहेबांनीच सामनाचे महत्व सांगितले आहे. असा टोला सामंत यांनी लगावला आहे.