‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?
राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार, महाविकास आघाडीचे काय होणार?
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. शिंदे सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे. अशातच काॅंग्रेसमधून निलंबित झालेले काॅंग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी शिंदे आणि ठाकरे गटाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
आशिष देशमुख यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता १६ आमदारांच्या अपात्रतेचं काय होणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळच येऊ देणार नाहीत. जर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला गेला तर पुढील सहा वर्षांसाठी त्यांच्यावर ही अपात्रता लागू राहिल. त्यामुळ अनेकांचे राजकारण संपण्याचा धोका आहे. त्यामुळे दोन्ही गट आगामी काळात एकत्र येतील. आमदारांच्या अपात्रतेचे तांत्रिक मुद्दे पाहिले तर कुणालाही राजका रणातून बाद होणे पसंत पडणार नाही. मग एकच मार्ग राहिल तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र येणे असे देशमुख म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीत राहणार नाही. तसेच उद्धव ठाकरे अन् शिंदे एकत्रित आल्यानंतर पुन्हा ठाकरे भाजपसोबत जातील. असा दावाही असंही आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भुकंपाची चर्चा होत आहे.
महाविकास आघाडीबाबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडीत जागावाटापाबाबत वाटाघाटी चालु असल्या तरी लवकरच महाविकास आघाडी तुटलेली दिसणार आहे. महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस राहिल, असंही त्यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीला पोषक वातावरण असताना काँग्रेसच्याच नेत्याने केलेल्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत अनिश्चित वाढली आहे.