
भरचौकात कार चालकाने केली महिलेला बेदम मारहाण
मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल, गृहमंत्र्यांच्या शहरातच महिला असुरक्षित
नागपूर दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची उपराजधानी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या टॅक्सी चालकाने भररस्त्यात अडवून एका महिलेला जबर मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कारचालक शिवशंकर श्रीवास्तव इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. त्याचवेळी मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओवरटेक केले. महिला पुढे गेल्याने कारचालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेला शिवीगाळ सहन न झाल्याने ती दुचाकीवरून उतरून कारचालकाशी वाद घालू लागली. या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाचे अचानक हाणामारीत रुपांतर झाले. महिला कारच्या बोनेटजवळ उभी असतानाच आरोपी कारमधून खाली उतरला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली. काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागपूरकरांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मारहाण करणाऱ्या या व्यक्तीवर कठोरात-कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरी पटका पोलिसांनी या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारचालकाला पोलीसांनी अटक केली आहे.