
शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला महिला शिवसैनिकांचा चोप
चालत्या वाहनातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे 'असे' कृत्य, महिलांनी केली धुलाई
नाशिक दि ५(प्रतिनिधी)- दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला आहे. शिवसैनिक महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला चांगलाच चोप दिला आहे. नाशिक मुंबई मार्गावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने ही मारामारीची घटना घडली आहे.
शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईत होत असलेल्या दोन दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते आक्रमक आहेत. शहापूरजवळ शिवसेना नाशिक शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भर रस्त्यात चोप दिला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅव्हल्स बसमध्ये बसलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडे बघून हातवारे केले, त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडी थांबवून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना वाहनातून उतरवत चांगलाच चोप दिला आहे. शहापूर शहराजवळ ही घटना घडली आहे. मारहाण झालेले शिंदे समर्थक हे अहमदनगर जिल्ह्यातील असावेत अशी माहिती देण्यात आली आहे. मारहाण प्रकरणानंतर शहापूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण नंतर मात्र दोन्हीकडील समर्थन मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीसांनी तयारी केली आहे पण त्याआधीच कार्यकर्ते भिडल्याचे दिसून आले.
शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बसेस, खासगी वाहनांमधून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहेत. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच वादाच्या घटना घडत आहेत.