भाजपा नेत्याने केली गोळी झाडून तरुणीची हत्या
गोळी झाडल्यानंतर गाडीत घेऊन सात तास प्रवास, वेदिकाच्या हत्येच्या तपासाचे मोठे आव्हान?
भोपाळ दि २७(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील वेदिका ठाकूर हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळी झाडण्यात आली होती. ही गोळी भाजप नेता प्रियांश विश्वकर्माच्या यांच्या बंदुकीतून झाडण्यात आली होती. आता याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
वेदिकावर गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता तिचा मृत्यू झाला आहे. वेदिकावर गोळी झाडण्यात आली त्यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रीण पायल होती. मात्र तेव्हापासून ती गायब आहे.पोलिसांनी आता या प्रकरणातील आरोपी नेता प्रियांश विश्वकर्मा याच्याविरुद्ध आधीच नोंद झालेल्या गुन्ह्यात हत्येचा आरोपाचा समावेश करण्यात आला आहे. वेदिकावर गोळीबार केल्यानंतर आरोपी प्रियांश ७ तास तिला घेऊन कारमध्ये फिरत होता. तसेच विश्वकर्मा यांच्या ऑफिसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आणि पिस्तुल गायब करुन पुरावे नष्ट करण्यात आले होते. ही घटना १६ जूनला घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी १९ जून रोजी प्रियांश विश्वकर्माला अटक केली होती. वेदिका ठाकूरच्या हत्येनंतर तिचे काका अशोक ठाकूर यांनी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वेदिकाच्या काकांनी सांगितले की, जेव्हा वेदिकाला गोळी मारण्यात आली होती तेंव्हा तिची मैत्रिण पायलही तिच्यासोबत होती. जी घटना घडल्यापासून बेपत्ता आहे. वेदिकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करून तिच्या शरीरातून एक गोळी काढली, ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी ती बुलेट एफएसएल टीमकडे तपासासाठी पाठवली आहे. वेदिकाच्या पोटात सापडलेली गोळी प्रियांशकडे असलेल्या पिस्तुलातून निघाली होती, याची खात्री बॅलेस्टिक तज्ज्ञांकडून केली जाईल. या संपूर्ण गोळीबारामागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वेदिका ठाकूर ही जबलपूरच्या एका सामान्य कुटुंबातील होती. त्यांच्या कुटुंबात एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वेदिकाच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे तर तिची आई गृहिणी आहे. दरम्यान फुटेज मिळवण्यासाठी जबलपूर पोलिसांनी सीसीटीव्हीशी संबंधित सर्व्हर कंपनीला पत्रही पाठवले आहे.