Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं..?, सरकार पडेल,की…?; ‘या’ आहेत पाच शक्यता…!

नगरविकास मंत्री व शिवसेनेतील पॉवरफुल नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता काय होऊ शकते?, शिंदे काय करतील?, शिवसेनेत फूट पडेल की नाही?, अशा अनेक प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या राजकारणात काय-काय होऊ शकतं, याच्या काही शक्यता पडताळून पाहूया.

१. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे समीकरण घडू शकते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये २९ आमदार आहेत, पण आणखी आठ आमदार असे आहेत जे मुंबई वा इतर ठिकाणी असूनही ते शिंदे यांच्यासोबत आहेत. याचा अर्थ शिंदे यांच्यासोबत ३७ आमदार आहेत. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत आणि शिंदे यांच्या आमदारांना आमदारकी टिकवायची असेल तर ३७ हे संख्याबळ पुरेसे आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दोन तृतियांश आमदारांनी बाहेर पडून वेगळा पक्ष वा गट स्थापन केल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकत नाही. त्या जोरावर, शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे आणि उपमुख्यमंत्रीपद शिंदे यांना द्यावे अशी अट उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली जाऊ शकते. कारण, शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची सत्ता अमान्य आहे.

२. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत आहेत पण महाविकास आघाडी सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून ते एक सूचना करू शकतात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून महाविकास आघाडीचे सरकार चालू द्यावे, असा प्रस्ताव पवार यांच्याकडून दिला जाऊ शकतो. पण तो ठाकरे मान्य करण्याची शक्यता दिसत नाही. एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू, असे सांगणारे ठाकरे हे सध्याच्या परिस्थितीत शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असे वाटत नाही. कारण, त्याचा अर्थ ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असा होईल. त्यामुळे सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न सफल होण्याची शक्यता दिसत नाही. ठाकरे यांच्या शिवसेनेतील वर्चस्वाला तो एकप्रकारे मोठा धक्का असेल.

३. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी काही दूत सूरतला पाठविले जात आहेत. समजा उद्या शिंदेंचे बंड थंड करण्यात शिवसेनेला यश आलेच (ज्याची शक्यता दिसत नाही) आणि शिंदे यांनी केवळ मंत्री म्हणून ठाकरेंच्या नेतृत्वात राहण्याचे मान्य केले तरी सरकारवरील धोका टळणार नाही. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपसोबत गेले नाहीत तर भाजपने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. तो ‘प्लॅन बी’ हा शिंदे यांच्या बंडापेक्षा कितीतरी वेगळा आणि मोठा धक्का देणारा असेल, असंही समजतं.

४. एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये जावू शकतात ही देखील एक शक्यता आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध झाली तर राज्यात सत्तांतरही लवकर होवू शकेल व ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल अशीही शक्यता आहे.

५. समजा ठाकरेंऐवजी शिंदे यांना मुख्यमंत्री केलेच तर ते काँग्रेसला मान्य नसेल असेही म्हटले जाते. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेस पार हादरली आहे. या निकालाने बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देऊ शकतात. नाना पटोले यांनी हंडोरे यांना उमेदवारी देण्याचा विशेष आग्रह धरला होता. काँग्रेसने एका जागेवर माघार घ्यावी यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी आग्रही होती. तथापि, पटोले यांनी त्यासाठी नकार दिल्याचे म्हटले जाते. विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोप लवकरच बघायला मिळतील. हंडोरे हे निष्ठावान काँग्रेसी आहेत आणि त्यांच्या पराभवाची अत्यंत गंभीर दखल काँग्रेसश्रेष्ठींनी घेतली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!