Latest Marathi News
Ganesh J GIF

रस्त्यावर ३० मिनिटे थरार, चाकू-कुऱ्हाडीचे सपासप वार; नागपुरात ‘लव्ह ट्रँगल’मधून गुंडाचा गेम

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून एका रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगाराची त्याच्याच मित्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. रस्त्यावर तब्बल ३० मिनिटे हा रक्ताळलेला थरार सुरू होता.

नक्की काय घडलं?

मयत गौरव रगडे याचे गेल्या दोन वर्षांपासून सुंदरबन परिसरातील ‘सपना’ नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, यवतमाळच्या दिग्रस येथील रहिवासी असलेल्या गौरव राऊत याचीही सपनाशी ओळख झाली आणि त्यांच्यातही प्रेमसंबंध निर्माण झाले. राऊत सपनासाठी नागपुरात राहण्यास आला होता व दोघांनी मिळून एक क्लाउड किचन सुरू केले होते. एकाच तरुणीवर दोघांचाही जीव जडल्यामुळे दोन्ही ‘गौरव’ यांच्यात वादाची ठिणगी पडली.

पार्टीदरम्यान राडा आणि थरारक पाठलाग

आरोपी गौरव राऊत हा दोन आठवड्यांपूर्वीच एका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. त्याने आयोजित केलेल्या पार्टीत सपना उपस्थित असताना मयत गौरव रगडे तेथे पोहोचला आणि त्याने जोरदार राडा घातला. खिडकीच्या काचा फोडत त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याचे पाहून राऊतने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रगडेने त्याला गाठले.

रस्त्यावर ३० मिनिटे हाणामारी आणि निर्घृण हत्या

यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी सुरू झाली. राऊतने स्वतःजवळील चाकू काढून रगडेच्या छातीत खोलवर खुपसला व कुऱ्हाडीनेही गंभीर वार केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा जीवघेणा संघर्ष तब्बल अर्धा तास सुरू होता. रगडेचा पांढरा शर्ट काही वेळातच रक्ताने माखला होता आणि तो रस्त्यावर झोकांड्या खात कोसळला.

आरोपी पोलिसांच्या तावडीत

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रगडेला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी गौरव प्रभाकर राऊत याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. मयत गौरव रगडे हा नागपुरातील अजनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्यासारखे सुमारे ९ गंभीर गुन्हे दाखल होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!