Latest Marathi News
Ganesh J GIF

‘१० वर्षांत हेही जमलं नाही तर केलं काय?’; दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, ZP शाळेची दयनीय अवस्था पाहून अभिजीत दिपके आक्रमक

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. शिक्षण व्यवस्थेची ही बिकट अवस्था पाहता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी जोरदार मागणी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

“पत्रे गळतात, बसायला बेंच नाहीत!”

शाळेची दुरवस्था पाहून प्रशासनावर ताशेरे ओढताना अभिजीत दिपके म्हणाले, “शाळेवर पत्रे आहेत आणि ते गळत आहेत. मुलांना वर्गात बसायला बेंच नाहीत. जर १० वर्षांत तुम्हाला एवढंही जमलं नसेल, तर मग तुम्ही केलं काय? दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. शाळांची ही अवस्था बघून त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही हक्क उरत नाही. जर त्यांना शिक्षणमंत्री म्हणून राहायचंच असेल, तर त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी उद्यापासून स्वतःच्या मुलांना सरकारी शाळेत पाठवावं आणि याच अवस्थेत त्यांना शिकू द्यावं.”

सरकारी शाळेत खासगी शाळेचे विद्यार्थी?

‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत औसा शहरात असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला दिपके यांनी भेट दिली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे खासगी असलेल्या ‘पीपल्स प्रायमरी स्कूल’चे विद्यार्थी आढळून आले. स्वतः विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपके यांच्यासमोर या गोष्टीची कबुली दिली आहे.

ग्रामसेवकाची मुजोरी आणि ग्रामस्थांचा संताप

उजनी येथील ZP शाळेच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. शाळेची संरक्षक भिंत आणि शौचालयासाठी निधी मंजूर झालेला असतानाही गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर दिपके यांनी थेट उजनीच्या ग्रामसेवकांना फोन करून रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता, ग्रामसेवकाने चिडून उत्तर दिल्याचे समोर आले. प्रशासनाकडे वारंवार खेटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना दिपके म्हणाले, “आपल्या न्याय्य हक्कासाठी नागरिकांनी लढा दिला नाही, तर अधिकारी असेच मुजोर होत जातात.”

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!