सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का
निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयानंतरही ठाकरे गटाला दिलासा, बघा काय म्हणाले न्यायालय
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना द्यावी ही याचिका फेटाळून लावली आहे. ॲड आशिष गिरी यांनी ही याचिका केली होती.
निवडणुक आयोगाने धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. यानंतर ॲड आशिष गिरी शिवसेनेच्या नावावरील मालमत्ता आणि बॅंक खाते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे वर्ग करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. पण “तुमचा या केसशी काय संबंध”, असे म्हणत ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावेळी गिरी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. पण यानंतर देखील शिंदे गटाकडून अधिकृतपणे कोणीतरी या संदर्भातील याचिका करु शकतो पण तसे होण्याची शक्यता कमी आहे, कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला संपत्ती नको आहे, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालले आहोत, असे म्हटले होते. पण तूर्तास या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसनेच्या ४० आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट यांच्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असुन सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.