फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे एकनाथ शिंदेना सुचक इशारा
फडणवीसांकडून नव्या राजकीय भूकंपाचे संकेत, शिंदेना बदलून पुन्हा एकदा ...
सांगली दि ६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना खोचक टोले लगावले आहेत.
जयंत पाटील यांनी आज सांगली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, मी पुन्हा येईन असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केल्याने या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असली पाहीजे, फडणवीस सध्या दुसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत ते शिंदेंना बाजूला ढकलून मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस वीरांनी करावी, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. राज्यात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध नाही. केंद्र सरकारने कामगार कायदे बदलले आहेत त्यामुळे तीनशेहून कमी कामगार असलेल्या ठिकाणी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यातून कामगारांचे शोषण होत आहे.
त्याप्रमाणेच बारसू येथील कामगारांचे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये, तसेच तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा, अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. यासाठीच आज उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे भेट दिली आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच या प्रकल्पातून पर्यावरणाची हानी होणार नाही असा विश्वास स्थानिकांना झाल्यास स्थानिक लोकच प्रकल्पाला मान्यता देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मी पुन्हा येईन असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केल्याने या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असली पाहीजे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी लगावला. फडणवीस सध्या दुसऱ्या क्रमांकावर बसलेले आहेत ते… pic.twitter.com/d0D8bAbjNR
— NCP (@NCPspeaks) May 6, 2023
नाणार येथेही लोकांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक होते ते कदाचित झाले नसावे. लोकांची समजूत घालणे, त्यांना विश्वासात घेणे हे कोणत्याही विकासमार्गाचे पहिले पाऊल आहे. ते जर सरकार टाळून रेटारेटी करत असेल तर अनेक प्रश्न तयार होतात. यातून स्थानिकांना हा प्रकल्प आपल्या विरोधी असल्याचे वाटतं, असंही जयंत पाटील म्हणाले.