आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात निर्णय घ्या
सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना फटकारले, शिंदे गटाची धाकधूक वाढली, उद्धव ठाकरेंना बळ?
दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून १६ आमदारांना अपात्र करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर्षी मे महिन्यात यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला होता. पण विधानसभा अध्यक्षांनी यावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून नार्वेकर यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने यावर आज सुनावणी घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले आहे. तसेच अपात्र आमदारांबाबत लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.
शिवसेनेच्या अपात्र आमदाराच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिरंगाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अपात्रतेच्या याचिकांवर एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे निर्देश देत, अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यास सांगितले आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार अध्यक्ष अनिश्चित काळासाठी कार्यवाही करण्यास विलंब करू शकत नाहीत, न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचा आदर केला पाहिजे, असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती. तसेच पक्षाचे चिन्ह देखील शिंदे गटाला देण्यात आले होते. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. तसेच नार्वेकर निर्णय घेण्यास दिरंगाई करत असल्याचाही आरोप केला होता. त्यावर आज न्यायालयानं सुनावणी घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. तसेच शिवसेना नाव व पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता ३ आठवड्यांनी होणार आहे. तर आमदार अपात्रतेसंदर्भात २ आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे कोर्टाच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण कोणतीही दिरंगाई केली नसल्याचे म्हटले आहे. माझ्यापर्यंत अजून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर कॉपी आली नाही. त्यानंतर मी या विषयावर सविस्तर बोलेल असेही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून सुरू असलेलं राजकीय नाट्य हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून संपुर्ण देशासाठी महत्वाचे आहे. जर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना पक्ष पुन्हा ठाकरेंना मिळण्याचीही शक्यता आहे. पण तूर्तास तरी विधानसभा अध्यक्षांची भुमिका महत्वाची आहे.