ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन
भाजपाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही, कंत्राटी भरतीचे पाप महविकास आघाडीचेच
नागपूर दि २०(प्रतिनिधी)- कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे असे बावनकुळे नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याबद्दल महायुती सरकारचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे अभिनंदन करून बावनकुळे म्हणाले, मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयावर सही केली. आता तेच कंत्राटी पद्धती देवेंद्र फडणवीस यांनी आणली असे म्हणून दोष देत नौटंकी करीत आहेत. त्यांच्यासारखा खोटारडा मानूस मी पाहिला नाही. कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि मविआचे उद्धव ठाकरे यांनी कंत्राटी पद्धतीने भरती केली. त्याचा पुरावा समोर आला आहे. कंत्राटी भरती हे कॉंग्रेसने केलेले पाप आहे.
उद्धव ठाकरेंसह मविआचे नेते केवळ बोलघेवडे आहेत. महाराष्ट्राच्या जनतेची केलेली फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीररीत्या उघड केली. त्यामुळे त्यांनी उद्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भाजपाचे राज्यभरातील लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील व आंदोलन करतील. महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या नेत्यांना भाजपा धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.