
राज्यातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी
निवडणूक आयोगाला आज हे निर्देश मिळण्याचे संकेत, सर्वांचे लक्ष
दिल्ली दि ७ (प्रतिनिधी) – राज्यातील सत्तासंघर्षावर दाखल झालेल्या याचिकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन केले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश असून स्वतः लळीत यांनी या घटनापीठात नसणार आहेत. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर शेवटची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी झाली होती. पुढील सुनावणी घटनापीठासमोर होईल, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर सत्तासंघर्षाच्या प्रकरणाच्या सुनावणीला तारीख मिळाली नाही. आज याप्रकरणी सुनावणी होणार असून निवडणूक आयोगावर सुनावणीसाठी घातलेली बंदीही आज उठू शकते. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केल्याने निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, शिवसेनेला २३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिवसेनेने चार आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. त्यानुसार, त्यांना मुदत वाढवून देण्यातही आली आहे. पक्ष आणि चिन्हाचा वाद मिटल्यास निवडणुकांसाठी तयारी करण्यास दोन्ही गटांना सोपं जाणार आहे, त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाला सुनावणी करण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे मंगळवारी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित उदय लळीत हे ८ नोव्हेंबरनंतर कार्यमुक्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःचा समावेश घटनापीठात केला नसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय लवकर होण्याची शक्यता कमी दिसत आहे.