
राज्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत एक क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकृत नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावरी शासकीय, अनुदानित आणि खासगी अशा सर्व प्रकारच्या शाळांमध्ये केली जाणार आहे.

काय आहे नवीन नियम?

आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या नावानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जात होते. मात्र, नव्या निर्णयानुसार नावाचा क्रम खालीलप्रमाणे असेल

१. स्वतःचे नाव -> २. आईचे नाव -> ३. वडिलांचे नाव -> ४. आडनाव.
हा निर्णय का घेतला?
शिक्षण विभागाने स्पष्ट केल्यानुसार, या निर्णयामागील मुख्य उद्देश आईच्या मुलाच्या जीवनातील योगदानाला सन्मान देणे हा आहे. समाजात लिंग समानता प्रस्थापित करण्यासाठी आणि सामाजिक समतोल साधण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
कुठे कुठे होणार बदल?
विद्यार्थ्यांच्या शाळेतील सर्व अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव असेल. यामध्ये प्रामुख्याने:
शाळेचे हजेरीपत्रक (Attendance Register)
गुणपत्रक (Mark sheet)
शाळा सोडल्याचा दाखला (LC – Leaving Certificate)
प्रवेश निर्गम उतारा (General Register)
विशेष परिस्थितीसाठी तरतूद:
ज्या मुलांचे पालक विभक्त किंवा घटस्फोटित आहेत, तसेच दत्तक मुलांच्या बाबतीत काय करावे, याबाबत संभ्रम होता. मात्र, अशा प्रकरणांमध्ये संबंधित पालकांच्या परिस्थितीनुसार आणि कायदेशीर कागदपत्रांनुसार योग्य ती नोंद ठेवण्याची विशेष तरतूद शिक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे.
“हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ओळखीत सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. कुटुंब आणि समाजात आईच्या भूमिकेला यामुळे योग्य सन्मान मिळेल.”
– संजय जावीर, शिक्षण निरीक्षक

