
विक्रेत्याकडून खंडणी वसूल करून दारू पिण्यासाठी गेल्यानंतर मित्रांमध्ये वाद होत कुख्यात गुन्हेगारांनी किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) याचा चाकूने खून केला.गुरुवारी दुपारी १ वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर भाजी मंडईत राजराेस रस्त्यावरील नशेच्या अड्ड्यावरच हा थरार घडला. पोलिसांनी तीन तासांत मुख्य मारेकरी दत्ता गणपत रोकडे (३८), शुभम सिद्धार्थ रणशूर ऊर्फ बड्या (१९) व कांतीलाल दौलत भुईगळ (५५, तिघे रा. मसनतपूर, शहानगर) यांना अटक केली.किशोर काही महिने आष्टी येथे आईसोबत राहत होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो शहरात परतला होता. तीन भावांमध्ये लहान असलेला किशोर गुरुवारी सकाळी ९ वाजता घराबाहेर पडला. एपीआय कॉर्नर परिसरात एका शर्मा नामक विक्रेत्यासोबत त्याचे वाद झाले. तेव्हा दत्ता, शुभम व कांतीलालही तेथेच उपस्थित होते. दत्ताने विक्रेत्याकडून पैसे, कपडे लुटून किशोरला दुचाकीवर बसवून ते मुकुंदवाडी भाजी मंडईत दारूच्या अड्ड्यावर गेले. दारू पिताना त्यांच्यात वाद झाला. तिघांनी किशोरला मारहाण करून पोटात तब्बल १० ते १२ वेळेस वार केले. अर्धा तास तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडून किशोर मरण पावला.

दुकाने पटापट बंद
हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून जवळच राजरोस उघड्यावरच नशा केल्या जाणाऱ्या मंडईत हा प्रकार घडताच दुकाने, हॉटेल बंद झाली. माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त मनहष कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक सचिन इंगोले घटनास्थळी गेले.

झटापट करून विरोध, पोलिसांकडून बळाचा वापर
दत्ता मसनतपूरमध्ये नातलगाच्या घरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, अंमलदार याेगेश गुप्ता, राजेंद्र साळुंके, मनोहर गिते, प्रमोद सुरसे, मंगेश शिंदे, श्रीकांत काळे, विलास कोतकर तेथे गेले. दत्ता व पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळल्या. दत्ताचा साथीदार शुभम शहर सोडण्याच्या तयारीत असतानाच एमआयडीसी सिडकोचे सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे यांनी त्यालाही पकडले. मुकुंदवाडीचे अंमलदार बाबासाहेब कांबळे, श्याम आडे, संतोष भानुसे यांनी कांतीलालला अटक केली.

हत्येला गुंडगिरी, खंडणीची किनार
पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर सकाळी ११ वाजता एपीआय कॉर्नर परिसरात शर्मा नावाच्या कपडे विक्रेत्याकडे गेला. तेव्हा दत्ता, शुभम, व कांतीलाल शर्माकडून पैसे व फुकट कपडे घेण्यावरून त्यांच्यात वाद झाले. शर्माने नवे कपडे व ५०० रुपये दत्ताला दिले. मात्र, किशोरने त्यापूर्वी तेथील माठांची तोडफोड केली. तेव्हा किशोरच्या हातातील चाकू हिसकावून दत्ता त्याला मुकुंदवाडीकडे घेऊन गेला व त्याच्याच चाकूने त्याची हत्या केली. खुनानंतर शर्माने दत्ताच्या टोळीवर खंडणीचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला तक्रार देण्यास सांगितले. मात्र, सायंकाळी त्याने ठाण्यातून धूम ठोकली. शर्मानेच दत्ता, शुभमला किशोरच्या हत्येसाठी उद्युक्त केले का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी
दत्तावर यापूर्वी शहर व जालन्यात लुटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, विनयभंग, प्राणघातक हल्ला, हत्येसारखे ८ पेक्षा अधिक गुन्हे व शुभमवर ३ गुन्हे दाखल आहेत. २०२२, २०२४ मध्ये त्याला एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध तर २०२१ मध्ये हद्दपार केले होते.
फॉरेन्सिक विभाग साडेतीन तासांनी
दुपारी १ वाजता हत्येचा थरार घडला. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत घटनास्थळ तशाच अवस्थेत होते. फॉरेन्सिक विभाग तब्बल साडेतीन तासांनी ४:३० वाजता पोहोचला. त्यानंतर भाग सील करण्यात आला. तोपर्यंत शेकडो लोकांनी तेथून ये-जा केली.

