
आज दिल्लीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह २३ घटक पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीची महत्त्वाची बैठक होत असतानाच, राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे. बिहारमधील सत्ताधारी जनता दल युनायटेडचे (JDU) राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी इंडिया आघाडीच्या अपयशाबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या दोन नेत्यांमुळेच इंडिया आघाडी उद्ध्वस्त झाली,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं? संजय झा यांचा ‘ऑन रेकॉर्ड’ दावा

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय झा यांनी इंडिया आघाडीच्या स्थापनेवेळचे पडद्यामागचे राजकारण उघड केले. ते म्हणाले की, “माझ्याकडे ऑन रेकॉर्ड माहिती आहे की, दोनच व्यक्तींनी मिळून ‘इंडिया’ आघाडीचा घात केला. त्या दोन व्यक्ती म्हणजे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल आहेत.”

नितीश कुमारांच्या नावावर खोडा कसा घातला?
संजय झा यांनी बैठकीतील ‘त्या’ रणनीतीचा खुलासा करताना सांगितले की नितीश कुमार सर्व विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना पदाची कोणतीही हाव नव्हती.आघाडीच्या निमंत्रकपदी नितीश कुमार यांच्या नावावर सर्वजण सहमत होते. मात्र, एका महत्त्वाच्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी पूर्वनियोजित रणनीतीनुसार ऐनवेळी खोडा घातला.त्या दोघांनी ‘आघाडीला दलित समन्वयक हवा’ असा मुद्दा उपस्थित करत मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले. या अनपेक्षित खेळीमुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आणि संपूर्ण प्लॅन पद्धतशीरपणे उधळून लावण्यात आला.
“आघाडीत दूरदृष्टीचा अभाव”
संजय झा यांच्या मते, या आघाडीत कोणताही निश्चित प्लॅन किंवा एकजूट नव्हती. “प्रादेशिक पक्षांना नेहमीच असे वाटत राहिले की, काँग्रेस फक्त मोजक्या राज्यांत राजकारण करते आणि त्याचा आपल्यावर काही फरक पडत नाही. यामुळेच ही आघाडी अपयशी ठरली,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना आत्मचिंतनाचा सल्ला
सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचे झा यांनी नमूद केले. जनतेमध्ये सरकारविरुद्ध कोणताही मोठा रोष नाही, असे सांगतानाच त्यांनी विरोधकांना सल्ला दिला की, “तुमचे राजकीय स्थान आता दुसराच कोणीतरी का हिरावून घेत आहे, यावर गांभीर्याने आत्मचिंतन करा.”

