
“एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते!”; हुसैन दलवाई यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दाव्या-प्रतिदाव्यांचे मोठे वादळ उठले आहे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी आणखी एक सर्वात मोठा दावा केला आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा खळबळजनक दावा हुसैन दलवाई यांनी केला आहे. दलवाई यांच्या या विधानामुळे राजकारणात नवी चर्चा रंगली आहे.

‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’

हुसैन दलवाई यांनी दावा केला आहे की, एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, हा प्रवेश नेमका कशामुळे राहिला, यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, अद्याप एकनाथ शिंदे यांच्याकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशावर काय म्हणाले दलवाई?
पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत केलेला दावा पूर्णपणे खरा असल्याचे हुसैन दलवाई यांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा पक्षप्रवेश नेमका कसा हुकला, याचा घटनाक्रम सांगताना दलवाई म्हणाले. गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून काँग्रेसमध्ये येण्यास पूर्णपणे तयार होते आणि सर्व चर्चा अंतिम टप्प्यात होती. मुंडे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी निघाले असतानाच त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांचा फोन आला.
अहमद पटेल यांनी मुंडेंना अट घातली की, तुम्ही आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि नंतर पुन्हा निवडून या.ही अट मुंडेंना मान्य नसल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही. दलवाई यांच्या मते, मुंडेंना काँग्रेसमध्ये न घेणे ही काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी चूक होती.
महादेव जानकर यांचाही समर्थनार्थ दावा
दुसरीकडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे (आरएसपी) प्रमुख महादेव जानकर यांनीदेखील या चर्चेला दुजोरा दिला आहे. गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळले होते, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा गांभीर्याने विचार करत होते, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

