Latest Marathi News
Ganesh J GIF

नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा २ वर्षांचा तिढा सुटला!; गिरीश महाजन आणि भरत गोगावलेंची अधिकृत घोषणा

महाराष्ट्रातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि राजकीय तिढा अखेर पूर्णपणे सुटला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून, राज्यपालांच्या मंजुरीनंतर शासनाचे सहसचिव भ. बु. गावडे यांच्या सहीने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे नेते तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तीव्र चढाओढ सुरू होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये महायुती सरकार आल्यापासून शिवसेनेचे भरत गोगावले या पदासाठी उत्सुक होते. जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर झाली होती, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून तीव्र निदर्शने केल्याने ही नियुक्ती स्थगित करावी लागली होती. बदललेले राजकीय समीकरण: विधानपरिषद निवडणुकीत कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना शिवसेनेने मदत केल्यानंतर समीकरणांमध्ये बदल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अखेर दीड वर्षांहून अधिक काळ रिक्त असणाऱ्या या पदावर भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

रायगडप्रमाणेच नाशिकच्या पालकमंत्रीपदावरूनही भाजप आणि शिवसेनेमध्ये (दादा भुसे) रस्सीखेच सुरू होती. २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल १० हजार कोटींहून अधिकचा निधी हाताळायचा असल्याने हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते.जानेवारी २०२५ मध्ये गिरीश महाजन यांची नियुक्ती शिवसेनेच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली होती. पद रिक्त राहिल्याने जिल्ह्यातील विकासकामे आणि नियोजन समितीच्या (DPDC) बैठका प्रभावित झाल्या होत्या.गिरीश महाजन हे कुंभमेळ्याशी संबंधित कामे प्रत्यक्ष हाताळत असल्याने अखेर वरिष्ठ पातळीवरील सहमतीनंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!